ठाणे : रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटने क्लब प्रेसिडेंट अरुणिमा सिंग, व्होकेशनल डायरेक्टर अनिल मोदी आणि सचिव अनुभा खराबे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील रोडास क्लब हाऊसमध्ये रोवेक्स (रोटरी व्होकेशनल एक्सलन्स) पुरस्कारांचे आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
अभिषेक सन्याल, रेखा गुप्ता, सुनील कुमार, रेश्मा राउते, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ, रिकी कृष्णानी, मेधा देशपांडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिषेक सन्याल हे एक जागतिक आर्थिक कार्यकारी आणि संशोधक असून हवामान बदल आणि कॉर्पोरेट प्रशासनाच्या अभ्यासासाठी ओळखले जातात. त्यांनी “रेक्वियम फॉर अ सोल्जर” हे पुस्तक लिहिले आहे आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न त्यांनी भारतीय सैनिकांसाठी समर्पित केले आहे. रेखा गुप्ता या एक कुशल जलतरणपटू आणि प्रशिक्षक असून अनेक लांब पल्ल्याच्या समुद्री पोहण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडने देखील प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली होती. सुनील कुमार हे अल्ट्रा-मॅरेथॉन स्पर्धांमधील एक अतिशय नावाजलेले धावपटू असून दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन आणि लडाख मॅरेथॉनसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक अल्ट्रा-मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
रेश्मा राउते मिसेस इंटरनॅशनल वुमन ऑफ सबस्टन्स ब्युटी विथ ब्रेन्स पुरस्कार विजेत्या आहेत. दोन दशकांच्या आयटी कारकिर्दीत त्यांनी कॉर्पोरेट जगतात विविधता आणि समावेशनाला प्रोत्साहन तर दिलेच पण कॉर्पोरेट जगतातील प्रवासासाठी अनेक महिलांना मार्गदर्शनही केले आहे. मिलिन्द बल्लाळ एक अनुभवी पुरस्कार विजेते पत्रकार असून ‘ठाणेवैभव’ दैनिकाचे संपादक आणि रोटरी सदस्य आहेत. संपादकीय योगदान, पुस्तके आणि सामुदायिक उपक्रमांमध्ये नेतृत्व यासाठी ते ओळखले जातात. रिकी कृष्णानी या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील एक उद्योजक असून त्यांचे हिरानंदानी इस्टेटमधील रिकीज बार एन किचन रेस्टॉरंट बरेच लोकप्रिय झाले आहे. कोविड-१९ साथीच्या काळातही त्यांनी त्यांच्या रेस्टॉरंट आणि क्लाउड किचनचा यशस्वीरित्या विस्तार केला. तसेच मेधा देशपांडे या मेधाज किचनच्या संस्थापक असून २४ वर्षांपूर्वी सुरू केलेला आणि आता विविध देशांमध्ये पोहोचलेला त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय कोविड-१९ संकटादरम्यानही अजिबात डगमगला नाही. दर्जेदार खाद्यपदार्थ आणि विविध उत्सवांदरम्यानच्या पॅकेजेससाठी मेधाज किचन ओळखले जाते.