भूमिकेचा केला अभ्यास – किरण गायकवाड

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘देवमाणूस’ ने टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. ‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आता ‘देवमाणूस’ ही मालिका पुन्हा एकदा एका नवीन पर्वासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.
मालिकेत प्रेक्षकांना अजितकुमार देव हा एका वेगळ्या रूपात पाहायला मिळतोय. नटवर सिंग जो राजस्थानमधून आता गावात आला आहे, तो नक्की देवमाणूस आहे का असा प्रश्न इतके दिवस प्रेक्षकांना पडत होता पण त्याचं उत्तर देखील मिळालं. नटवर सिंग हाच देवमाणूस आहे हे नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं.

 

ही भूमिका साकारतानाचा अनुभव शेअर करताना किरण म्हणाला, “जेव्हा मला कळलं कि नटवर सिंग हा राजस्थान मधला हातचलाखी करणारा माणूस आहे तेव्हा मी त्या ट्रिक्स शिकलो, जादूचे प्रयोग करण्याचे टिप्स फॉलो केल्या. राजस्थानी भाषेचं प्रशिक्षण घेतलं. आम्ही राजस्थानमध्ये शूटिंग सुरु केलं तेव्हा त्याच्या एक दिवस आधी मी तिथे मार्केटमध्ये फिरत होतो. तिथे मी लोकांचं निरीक्षण करत होतो. त्यांचा लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचसोबत नटवर सिंगच्या बायकोच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री प्रिया गौतम यांनी मला खूप मदत केली. त्या मूळच्या राजस्थानच्या असल्यामुळे त्यांची मला नटवर सिंग ही व्यक्तिरेखा आत्मसात करण्यासाठी खूप मदत झाली.”