मुख्यमंत्र्यांचे ठामपा आयुक्तांना निर्देश
ठाणे: केवळ रस्त्यांची सफाईच नव्हे, तर ती पाण्याने स्वच्छ धूऊन धूळमुक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुन्हा रस्त्यांच्या धुलाईला सुरुवात करा. त्यासाठी सांडपाण्यातून प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर करा अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिल्या.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या भारतरत्न स्व. लता दिनानाथ मंगेशकर गुरुकुलाचे भूमीपूजन तसेच ओवळा-माजिवडे विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमीपूजन लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई- ठाण्याचा कायापलट करण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
ठाण्यात यापूर्वी रस्ते पाण्याने धुतले जात होते. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कारकिर्दीत २०१८ साली या उपक्रमाची सुरुवात झाली होती. पण पुढे कोव्हिडमुळे हे काम ठप्प पडले. आता मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अंतर्गत शहरात मोठया प्रमाणात सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना ठाण्यातील रस्ते स्वच्छ राहतील. त्यावर धूळ, माती राहू नये यासाठी पाण्याने ती रस्ते धुवून काढावेत, अशा सूचना दिल्या. तसेच डेब्रिज असणार नाही. रस्त्यात दुभाजकावर जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावा, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.
ठाण्याला अतिरिक्त पाण्याची गरज आहे. त्यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते.
विकासकामांचा धडाका
पोखरण रोड नं. १ येथील सिंघानिया शाळेसमोरील तीन कोटी ७५ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पण करण्यात आले. अमृत २.० योजने अंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि विस्तारीकरणाच्या २०० कोंटींच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी, ओवळा-माजिवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण, मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फुटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे (२५ कोटी) या कामांचाही ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ मुख्य सोहळ्यात करण्यात आला.