कार्यशाळेच्या पूर्वतयारीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
ठाणे: मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्वांसाठी घरे, आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स आणि हायटेक आयटी पार्क, पर्यावरण पूरक विकास (ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, सौरउर्जा, सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा अधिकाअधिक विकास धोरण ठरवण्याच्या अनुषंगाने वापर) तसेच इंडस्ट्रिज ४.० च्या अनुषंगाने सेमी कंडक्टर आणि सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग तसेच वाढवण बंदर विकास या ठळक मुद्यांवर १२ ते १५ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत ठाणे जिल्ह्यात कार्यशाळा आयोजित होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र विकास धोरण विकास २०३० साठी आयोजित कार्यशाळेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर, २०२४ रोजी समिती सभागृहात विशेष बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) संस्थेचे उपाध्यक्ष सुशिल खोडवेकर, ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रोडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाचा महानगर क्षेत्रातील विकास धोरणाच्या जडणघडणीत महत्त्वाचा हातभार लागणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी महोदयांनी या बैठकीत व्यक्त केला.