नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईची झळ

धरणांचे पाणी बंद; नळ पडले ओस

शहापूर: शहापूर तालुक्यातील आदिवली, वेहळोली, खराडे तसेच मुरबाड तालुक्यातील खांडपे व पाडाळे या धरणांचे पाणी सोडणे सध्या बंद केले आहे. यामुळे काळू नदी काठच्या गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांचा पाण्याचा स्रोत बंद झाल्याने या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान गावांमधील पाणीटंचाई लक्षात घेता या धरणांमधील पाणी सोडण्यासंदर्भात शहापूर गटविकास अधिकारी यांनी मुरबाड व शहापूर येथील पाटबंधारे विभागाला कळविले आहे.

तालुक्यातील नांदवल, गेगाव, शीळ, शेलवली (बां), कळगाव, ठिले व शेंद्रूण आदी ग्रामपंचायत हद्दीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ग्रामपंचायत हद्दीमध्ये नळ पाणी पुरवठा योजना आहेत. मात्र धरणांचे पाणी सोडणे बंद केले असल्याने काळू नदी पात्र कोरडेठाक पडले आहे. किंबहुना या गावांमधील असलेल्या पाणी योजनांचा पाण्याचा स्रोत बंद झाला आहे. याबाबत नांदवल, गेगाव, शेंद्रूण, शीळ, शेलवली (बां), कळगाव, ठिले या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतींनी शहापूर पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडे टँकरची मागणी केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खारीक यांनी दिली.

पाणीटंचाई, अकार्यक्षम शेती पद्धती आणि भूजलाचा बेसुमार उपसा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे महत्त्वाचे जलस्रोत कमी झाले आहेत. किंबहुना हवामान बदलामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. ज्यामुळे अनियमित पर्जन्यमान होते. खराब पाणी व्यवस्थापन आणि योग्य पायाभूत सुविधांचा अभाव देखील संकट वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्यांच्या बोरिंगला मुबलक पाणी आहे ते कारण नसतांनाही पाण्याचा उपसा करत असतात. तसेच भाजीपाल्यासाठी पाणी घेताना कोणतेही मोजमाप नसते. संपूर्ण रात्र आणि दिवसा नदी पात्रातील पाण्याचा उपसा सुरु असल्याचे दिसून येत आहे.

नांदवाल, गेगाव, शेलवली गावातील पाणी पुरवठा योजनेचा उद्भव काळू नदीच्या पात्रातून होत आहे. मात्र या नदीत खांडपे व पाडाळे धरणातून सोडले जाणारे पाणी बंद केल्याने पाण्याचा स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे नदीलगत असणाऱ्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, असे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल डोंगरे यांनी सांगितले.