रिक्षा-टॅक्सीभाडे वाढणार; राज्य सरकारकडून संकेत 

मुंबई: रिक्षा आणि टॅक्सी भाडे वाढवण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली. त्यामुळे आधीच महागाईचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याची चिन्हं आहेत.

रिक्षा आणि टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सातत्याने संबंधित संघटनांकडून केली जात आहे. पेट्रोल-डिझेल यांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने ही मागणी करण्यात येत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना सीएनजीच्या किंमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सींना तोटा सहन करावा लागत असल्याची तक्रार संबंधित संघटनांकडून केली जात आहे.

सहा सुविधा फेसलेस होणार; ‘आरटीओ’तील हेलपाटे थांबणार

पूर्वी वाहनासंबधीत आणि लायसन्स संबंधित कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आरटीओची कामं म्हटलं की कानाला हात लावायचे. मात्र आता आरटीओमधील काही कामे आरटीओत न जाता करता येणार आहेत.

परिवहन विभागात वाहनाच्या आणि अनुज्ञप्तीच्या (लायसन्स) प्रत्येकी तीन अशा एकूण सहा सेवा आता फेसलेस होणार आहेत. परिवहन विभागाच्या वतीने फेसलेस सेवेचा शुभारंभ परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते परिवहन आयुक्त कार्यालयात आज झाले आहे.

वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक, स्थानांतर एनओसी, लायन्ससवरील पत्ता बदल, रिनीव्हल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, डुप्लिकेट लायसन्स या सेवा ऑनलाईन होणार आहेत.

जवळपास 17 ते 18 लाख लोकांच्या वर्षभरातील आरटीओच्या फेऱ्या वाचणार आहेत. पूर्वी या सुविधा ऑनलाइन होत्याच मात्र एकदातरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जावे लागत असे. मात्र या पुढे या सेवांसाठी आता आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही सर्व ऑनलाइनच होणार. फेसलेस सेवेमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन एजंटला पैसे देण्याची गरज पडणार नसून येत्या काळात आरटीओ कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी होण्यात मदत होणार आहे.

सद्यःस्थितीत अनेक सेवांसाठी लागणाऱ्या क्लिष्ट कागदपत्रांमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. काही जण एजंटचा पर्याय स्वीकारतात. मात्र आता नागरिकांना घरबसल्या आपल्या अँड्रॉईड मोबाईल किंवा संगणकाद्वारे आपली आरटीओमधली काम करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि तो लिंक असलेला मोबाईल क्रमांक सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
केंद्र सरकारने गेल्यावर्षी 18 सोयी फेसलेस करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार महाराष्ट्र परिवहन विभागाने आता फेसलेस सुविधेवर भर दिला आहे. त्यात आता एनआयसीमार्फत सहा सुविधा फेसलेस केल्या गेल्या आहेत. पुढेही अनेक सुविधा दिल्या जातील, असे परिवहन आयुक्तांनी सांगितले. आज मुंबईत सहा फेसलेस सुविधांचा परिवहन विभाग कार्यालयात शुभारंभ झाला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयातील अधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते.