मीटर कॅलिब्रेशनबाबत रिक्षाचालक उदासीन

* अधिकृत रिक्षांपैकी ५० टक्केच रिक्षांनी केले मीटर कॅलिब्रेशन
* ३० एप्रिलची अंतिम मुदत

ठाणे : रिक्षा मीटर दरवाढीनंतर अडीच महिने उलटूनही, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत सुमारे ८० हजार रिक्षांपैकी फक्त ४०,७०० रिक्षांनी कॅलिब्रेशन केल्याचे समोर आले आहे. उर्वरित रिक्षांवर कारवाई होण्याची शक्यता असून, ३० एप्रिलही अंतिम मुदत आहे.

रिक्षाभाडे वाढवून मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटना मागणी करत होत्या. त्यानुसार २३ जानेवारी २०२५ रोजीच्या मा. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या बैठकीत रिक्षा भाडेवाढबाबत निर्णय झाला. १ फेब्रुवारीनंतर हे दर लागू झाल्यावर मीटरच्या टेरिफमध्ये बदल होणे आवश्यक आहे. बहुतांशी रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरवर किमान भाडे २३ रुपये दर्शवले जाते. मात्र दर वाढीबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रिक्षाचे भाडे देताना प्रवासी आणि चालकात भांडणाचा प्रकार सर्रास होतो आहे. खरं तर रिक्षा चालकांनी जितक्या लवकर होईल तितकं मीटर टेरिफमध्ये बदल करणे गरजेचे आहे. ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे १८ रिक्षा मीटर दुरुस्ती केंद्रांची नोंद आहे तर ठाणे, मीरा-भाईंदर आणि ऐरोली या तीन ठिकाणी मीटर कॅलिब्रेशन केले जाते. कार्यालयाकडील अधिकृत नोंदणीनुसार ८० हजाराहून अधिकृत रिक्षा धावत आहेत. यापैकी साधारण ४०,७०० रिक्षा चालकांनी मीटर कॅलिब्रेशन केलेले आहे. उर्वरित रिक्षाचालकांना मीटर कॅलिब्रेशनसाठी ३० एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर रिक्षांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. मीटर कॅलिब्रेशन करताना मीटर दुरुस्ती, मीटर अपग्रेड शासकीय पडताळणी शुल्क धरून ७०० रुपयांचा शुल्क आकारला जातो. त्यानुसार रिक्षा चालकांनी शुल्क द्यावे, अशी माहिती रोहित काटकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांनी दिली.

रिक्षातून रोजच फिरणं नसतं. महिनाभरातून केव्हातरी प्रवास होतो. त्यामुळे रिक्षाच्या दराबाबत माहिती नसते. मीटर रिडींगप्रमाणे भाडे देतो. पण मीटरवर एक आणि रिक्षाचालक भाडे वेगळेच सांगतो. रिक्षाचालक काहीही भाडं सांगेल म्हणून आम्ही द्यायचं का?, असा प्रश्न महात्मा फुले नगर येथील साक्षी साबळे यांनी उपस्थित केला.