उष्म्याने गलितगात्र घुबडाला जीवनदान

ठाणे : वाढत्या उष्णतेने पक्षी भलतेच हैराण झाले असून, निशाचर पक्ष्यांचा जीव देखील कासावीस झाला आहे. ठाणे पूर्वेत रस्त्याच्या कडेला थकलेल्या अवस्थेतील एका गव्हाणी घुबडाला कावळ्यांच्या तावडीतून ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवदान दिले आहे.

ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढत असताना याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत असून, रात्रीचा संचार असणाऱ्या घुबड पक्ष्याला देखील उन्हाचा फटका बसला आहे. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा सागर निनाद सोसायटीमध्ये जिन्यात अडगळ आहे. मात्र या अडगळीच्या जागेत एक घुबड बसलेले असल्याची माहिती दक्ष नागरिक अभिजित थुले यांनी ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांना दिली. त्यानुसार रविवारी सकाळी १० च्या सुमारास भरत मोरे घुबड पक्ष्याला पकडायला गेले. मात्र तिथून उडत ते जवळच्या रस्त्यावर आडोशाला बसून राहिले होते.

पोटात पाणी कमी असल्याने त्याला व्यवस्थित उडता येत नव्हते. अशातच कावळे देखील घुबडाचा पाठलाग करू लागले. मात्र भरत मोरे यांनी घुबडाला शिताफीने पकडले. या पक्ष्याला कोणतीही इजा झाली नसून, उष्मा सहन न झाल्यामुळे ते आडोशाला आधार घेऊन बसले असावे अशी शक्यता आहे. या घुबड पक्ष्याचा संचार रात्री असल्यामुळे, आता योग्य ती काळजी घेऊन, रात्रीच त्याच्या अधिवासात सोडणार असल्याचे पक्षीमित्र भरत मोरे म्हणाले.