आरओ प्लांटमुळे रहिवाशांना दिलासा
ठाणे: ऐन उन्हाळ्यात वाढत्या पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या माजीवडा, कापूरबावडी आणि नळपाडा भागातील नागरिकांना पुनरुज्जीवित विहिरींमुळे दिलासा मिळाला आहे. या विहिरींवर आर. ओ. प्लांट उभारण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाईही काही अंशी दूर झाली आहे.
ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील ४६ विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून विहिरींची गाळसफाई, मजबुतीकरण, संरक्षक उपाययोजना आणि शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट उभारणीची कामे सुरू आहेत. सध्या उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येत असून अनेक भागांत कमी दाबाने किंवा खंडित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत आहेत.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, विहिरींमध्ये सांडपाणी मिसळू नये यासाठी जाळ्या बसविणे, भिंतींचे मजबुतीकरण, नियमित स्वच्छता आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी अशा उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील ४६ विहिरींपैकी १२ विहिरींचे काम पूर्ण झाले असून दर आठवड्याला तीन ते चार विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात हा उपक्रम शहरातील इतर भागांतही राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला माजी महापौर एच. एस. पाटील, नगरसेवक संजय भोईर, मुकेश मोकाशी, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, स्नेहा आंब्रे, आशादेवी सिंह यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.