उपमुख्यमंत्री-परिवहनमंत्र्यांनी ताफ्यातील वाहने केली कमी

* पंतप्रधानांच्या आवाहनाला शिंदे गटाकडून प्रतिसाद

ठाणे : वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केल्याची माहिती बुधवारी दिली. यासोबतच त्यांच्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील त्यांच्या ताफ्यातील वाहने कमी केल्याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे तसेच पर्यायी ऊर्जेकडे वळण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आपण इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार केल्याचे शिंदे यांनी नमूद केले. कोविड काळातही मोदींनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यामुळे देशाने संकटावर यशस्वी मात केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करावा, यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण संवर्धनासोबतच खर्च आणि इंधन बचतीच्या दृष्टीनेही इलेक्ट्रिक वाहने उपयुक्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशासमोर गंभीर प्रश्न उभे असताना आरोप-प्रत्यारोपांऐवजी सर्वांनी एकत्र येऊन देशहिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील वाहनताफ्यात कपात केल्याची माहिती दिली. आपल्या ताफ्यातील तीन वाहने कमी करण्यात आली असून आवश्यक तेवढ्याच गाड्यांचा वापर सुरू ठेवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर मंत्र्यांनीही वाहनताफा मर्यादित ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे त्यांनी समर्थन केले. टेस्ला वाहन वापरल्यामुळे सोशल मीडियावर टीका झाली होती, मात्र पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मंत्र्यांनी विदेशी दौरेही रद्द केल्याचा उल्लेख त्यांनी केला. राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी २० हजार इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा संकल्प सरकारने केला असल्याचे त्यांनी जाहीर केले. पीपीपी तत्त्वावर राज्यभर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू असून एसटी महामंडळासाठी ‘छावा’ नावाचे स्वतंत्र ॲप विकसित केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.