शरद पवार गटाची टीका
ठाणे : तीन मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे कारण पुढे करीत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याने हे राज्य शासनाचे अपयश आहे. गेल्या वर्षभरात पेपरफुटीची पाच प्रकरणे झाली आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली.
देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ठाणे जिल्ह्यातील १२,८६२ विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. एनटीएच्या या निर्णयाचा मनोज प्रधान यांनी चांगलाच समाचार घेतला. वर्षभरात पेपरफुटीची चार प्रकरणे ताजी असतानाच आता नीटची पेपरफुटी उघडकीस आली आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्ने धुळीस मिळाल्याचे म्हटले आहे.ठाणे जिल्ह्यातील १२,८६२ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी प्रधान यांनी केली.