ठाण्यात अभूतपूर्व वाहतूककोंडी कायम
ठाणे : सकाळी आणि संध्याकाळी अवजड वाहनांना परवानगी देण्यात येऊ नये असे आदेश तत्कालीन पालकमंत्री आणि सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाही वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने ही वाहने सर्रास सोडली जात असून त्याचा फटका ठाणेकरांना बसत आहे. गेले काही दिवस नागरिकांना अनेक तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.
मागील १५ दिवसांपासून ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोपरी पुलापासून ते थेट माणकोलीपर्यंत घोडबंदर रोड येथे मुंबई-गुजरात मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अर्ध्या तासाच्या अंतराकरिता चार-चार तास प्रवास करावा लागत असल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले आहेत. मुंबई-नाशिक आणि गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे दरदिवशी हजारो कंटेनर ये-जा करत असतात. त्यांच्यामुळे शहरातून जाणाऱ्या मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे कासवगतीने वाहतूक सुरू आहे.
मागील वर्षी या मार्गावर खड्डे पडले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांची दुरुस्ती करून कामाचा दर्जा राखण्याचे आदेश दिले होते. तसेच सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी सहा ते १० या दरम्यान अवजड वाहतूक (जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळून) करण्यास मनाई करण्याचे आदेश दिले होते. या वाहनांकरिता खारीगाव नाका येथे एमएमआरडीएच्या भूखंडासह पाच ठिकाणी पार्किंगची सोय करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासन करत नाहीत, त्यामुळे सर्रास दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ या मार्गावर सुरु आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ठाणेकरांना बसत आहे. अनेकांना मागील काही दिवस कामावर जाण्यास उशीर होत आहे. रूग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीत अडकत आहेत, त्यामुळे दिवसा अवजड वाहतूक बंद करून वाहतूक कोंडीतून ठाणेकरांनी सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची पोलिसांनी अंमलबजावणी करावी आणि वाहतूक पोलीस विभागासाठी कायमस्वरूपी पोलीस उपायुक्त नियुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे.