ठाणे: भाजपा ठाणे शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कळवा-मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवांरांच्या विजयाचा संकल्प शनिवारी करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनी ठरविलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करण्याचा निर्धार भाजपाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाअधिवेशनानंतर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक खारकर आळीतील महाजनवाडी येथील सभागृहात उत्साहात पार पडली.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे लोकसभा विस्तारक जयप्रकाश ठाकुर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, ओवळा-माजिवडा विधानसभा प्रमुख मनोहर डुंबरे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, माजी नगरसेवक संदीप लेले, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी आदींसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीला पालघरचे भाजपा खासदार हेमंत सवरा यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र, अपरिहार्य कारणामुळे ते अनुपस्थित होते.
या बैठकीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रदेश महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार विधानसभा निवडणुकीपर्यंत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तर आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार, कोकणात सहापैकी पाच जागांवर महायुतीचा झेंडा फडकविण्यात महत्वाचे योगदान असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह प्रस्थापित करण्यात आले होते. त्याचा मुकाबला भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करून मतदारांना भाजपाची भूमिका पटवून द्यावी. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याबरोबरच त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. नवमतदारांच्या नोंदणीबरोबरच लोकसभा निवडणुकीत वगळलेली व गायब झालेल्या मतदारांची आवर्जून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.