मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सुपूर्द केला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिलं आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोणा होणार, याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत आहे.