दिव्यात शेकडो नागरिक पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर
ठाणे: दिव्यातील ५४ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर येथील शेकडो रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळी ठाणे महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाईसाठी पोहोचल्यानंतर रहिवाशांनी हातात पेट्रोलने भरलेल्या बाटल्या घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यांच्या रोषापुढे पोलिस बंदोबस्तातील पथकाला माघार घ्यावी लागली.
दिवा येथे २०१७ ते २०२१ या काळात उभारण्यात आलेल्या ५४ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यातील दोन इमारतींच्या रहिवाशांनी ही कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे उर्वरित ५२ इमारतींवर कारवाईची टांगती तलवार होती. या बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना पालिकेने रितसर नोटीस बजावल्यानंतर सोमवारी २४ फेब्रुवारीला अतिक्रमण विभागाचे पथक पोलिसांचा फौजफाटा घेऊन येथील अनंत पार्क या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यासाठी सकाळी धडकले. मात्र त्याआधीच येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. रहिवाशांनी ठिकठिकाणी हाताने लिहिलेले पोस्टर लावून निषेध नोंदवला होता. कारवाई केली तर आत्मदहन करण्याचा इशाराही यातून देण्यात आला होता. इतकेच नव्हे तर इमारतीबाहेर एका प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवून एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
पालिकेचे पथक जेसीबी, हतोडा घेऊन दिव्यात पोहचताच मुख्य रस्त्याचा ताबा महिलांनी घेतला. एकीकडे मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, अशा परिस्थितीत आम्ही जायचे कुठे असा सवाल करत त्यांनी ठिय्या दिला. यावेळी पालिकेच्या पथकासोबत रहिवाशांची शाब्दीक चकमक झाली. हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन काही रहिवासी उभे असल्याने तणाव निर्माण झाला. आक्रमक पवित्रा, आक्रोश आणि घोषणाबाजीमुळे पालिकेचे पथकही हतबल झाले असल्याचे यावेळी दिसून आले. अनंत पार्कच्या रहिवाशांच्या आंदोलनाची माहिती मिळताच इतर इमारतीचे रहिवासीही आपले घर वाचवण्यासाठी आंदोलनस्थळी पोहचले. हजारोंचा जथ्था गोळा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त दिव्यात तैनात करण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या पथकाला तोडक कारवाई न करताच माघारी परतावे लागले.