‘त्या’ ६५ इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही – खा. शिंदे

नव्याने बाजू मांडण्यासाठी वकिलांची टीम देणार

ठाणे: कल्याण-डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही. त्यांची बाजू कोर्टात नव्याने मांडण्यासाठी सरकारकडून वकिलांची टीम दिली जाईल आणि यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज दिले.

या इमारतींमधील रहिवाशांनी आज खासदार डॉ. शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार शिंदे यांनी रहिवाशांच्या अडचणी समजून घेतल्या.

उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला दिले आहेत. या ६५ इमारतींमधील ६५०० कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर या इमारतींमधील रहिवाशांनी आज खासदार डॉ. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, ६५ इमारती तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या इमारतींमधील रहिवाशांनी जेव्हा घरे घेतली तेव्हा त्यांना ‘केडीएमसी’च्या खोट्या परवानग्या दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बिल्डरांना जबाबदार धरायला हवे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. या लोकांना बेघर करु देणार नाही, याला आमचे प्राधान्य आहे. यासाठी वकिलांची एक टीम रहिवाशांना उपलब्ध करुन देऊ. कोर्टात पुन्हा कशाप्रकारे नव्याने बाजू मांडता येईल याबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

महायुती सरकार आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते आहे. त्यामुळे सरकार या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढेल आणि रहिवाशांना दिलासा देईल, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, यापूर्वीही कल्याण डोंबिवलीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्या त्या वेळी सरकार रहिवाशांच्या पाठिशी उभे राहिले होते. सरकारने २७ गावांचा ५०० कोटींचा कर माफ केला होता तसेच या गावांसाठी क्लस्टर योजना राबवली होती. उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी वेगळा यूडीसीपीआर आणला होता. म्हाडाच्या प्रश्नामध्ये तेथील रहिवाशांना दोन हप्ते माफ करण्याचे काम सरकारने केले होते. यापूर्वी असे प्रश्न निर्माण झाले होते. त्यावेळी सरकारने पूर्ण ताकदीनिशी या प्रकरणातून मार्ग काढला होता. आताही सरकार पूर्णपणे या रहिवाशांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. हा लोकांच्या घरांचा विषय आहे. अनेक वर्ष लोक घरांचे स्वप्न पाहता आणि आयुष्याची जमापुंजी खर्च करुन घर विकत घेतात. त्यामुळे यात कोणीही राजकारण करु नये, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.