ठाणे : दिवा-शिळ मार्गावरील हॉटेलच्या कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने झालेल्या धक्काबुक्कीत काँक्रिट फुटपाथवर पडून एका ६२ वर्षांच्या स्थानिक नागरिकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना ३ जून रोजी घडली. या प्रकरणी कर्मचाऱ्याचा जामिन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान मुंबई आणि पुण्यातील घटनांच्या धर्तीवर आरोपीवर गंभीर गुन्ह्याचे कलम दाखल करून हॉटेलचा परवानाही रद्द करण्याची मागणी दक्ष नागरिक करत आहेत.
जयवंत शिंदे असे मृत्यू पावलेल्या रहिवाशाचे नाव असून त्यांचा मुलगा अभिषेक शिंदे यांनी याबाबत मुंब्रा पोलीस स्थानकात जबाब दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या जबाबानुसार ३ जून २०२४ रोजी जयवंत शिंदे हे दिवा शीळ मार्ग येथील एशियन क्युजिन हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोर निपचित पडलेले आढळून आले. मात्र कळवा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
हॉटेलच्या सी सी टिव्ही कॅमेऱ्याच्या उपलब्ध फुटेजमध्ये हॉटेलचा कर्मचारी संदेश शेट्टी हा जयवंत शिंदे यांच्याशी बोलताना दिसत आहे. थोड्या वेळाने शेट्टी याने जयवंत यांना दोन्ही हाताने जोरात धक्का दिला. त्यामुळे ते सिमेंटच्या पदपथावर उलटे पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडतेवेळी हॉटेल मालक आकाश म्हात्रे हे सुद्धा फुटेजमध्ये दिसत असल्याचा जबाब तक्रारदार अभिषेक शिंदे यांनी दिला आहे.
या प्रकरणी संदेश शेट्टी याच्या विरोधात कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. तोरडमल यांनी दिली.
याप्रकरणी दिव्यातील जागरूक नागरिकांच्या भावना तीव्र असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि पुण्यात दारू पिऊन वाहन चालवत अपघातात जीवितहानीस कारण ठरलेल्या चालकांवर कठोर कारवाई झालीच पण ज्या हॉटेलमध्ये आरोपीने मद्य प्राशन केले त्या होटेलवरही कठोर कारवाई करण्यात आली. दिव्यातील या घटनेत तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यानेच हॉटेल मालकासमोर रहिवाशाला मारहाण केली. त्यात या रहिवाशाचा मृत्यू झाला. मग संबंधित आरोपी आणि मालक यांच्यावरही योग्य कलम लावून गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच या हॉटेलवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी दक्ष नागरिक करत आहेत.