रेश्मा राठोडची खो-खो भारतीय संघात चमकदार कामगिरी

कल्याण : एसएसटी महाविद्यालयाची विद्यार्थीनी रेश्मा राठोड हिची प्रथम खो-खो विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती, जिथे भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय नोंदवत नेपाळवर मात करून विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. ही प्रतिष्ठित स्पर्धा दिल्ली येथे पार पडली, ज्यात २० देशांनी सहभाग घेतला होता.

रेश्माच्या पराक्रमाने एसएसटी महाविद्यालयाचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. खेलो इंडिया गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून, राष्ट्रीय स्तरावर अनेक विजेतेपदे मिळवून रेश्माने तिच्या खेळातील कौशल्य सिद्ध केले आहे.

तिच्या यशाचे श्रेय पालक, प्रशिक्षक नरेंद्र मेंगल व पंढरीनाथ म्हस्कर, तसेच एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापन, शिक्षक व क्रीडा विभागाला दिले आहे.

या संघामध्ये महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा समावेश होता. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येकी सव्वा दोन करोड रुपये बक्षीस रक्कम त्यासोबतच क्लास वन अधिकाऱ्याचे पद देण्यात येणार आहे. एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी यांनी या यशाला प्रेरणादायी ठरवले, तर क्रीडा संचालक प्रा. राहुल अकुल आणि इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रेश्माचे मन:पूर्वक अभिनंदन केले. रेश्माचा सन्मान करण्यासाठी एसएसटी महाविद्यालयातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.