ठामपा निवडणूक: महिला आणि ओबीसी वर्गासाठी सोडत
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाव्यतिरिक्त महिला जागांचे आरक्षण पुन्हा एकदा शुक्रवारी काढण्यात येणार आहे, त्यामुळे इच्छुकांची चिंता वाढली आहे
काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी ओबीसी समाजाच्या १५ जागांकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यापैकी आठ जागा महिलांसाठी आणि सात जागा सर्वसाधारण असणार आहेत. यापूर्वी ठामपातील ६४ जागांवर महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते, ते आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आता नव्याने आठ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून ५६ जागा सर्वसाधारण महिलांकरिता राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्या जागांवर पुन्हा लॉटरी काढली जाणार आहे, त्यामुळे यापूर्वी महिला आरक्षण न पडल्याने निश्चिंत झालेल्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मागील वेळी लॉटरी काढताना नशिबाने साथ दिली होती, यावेळी पुन्हा देवाने साथ द्यावी यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
ओबीसीकरिता प्रभाग निश्चित करण्यात आले नाहीत, त्यामुळे ओबीसीकरिता ३४ प्रभागांत कुठेही आरक्षण पडण्याची शक्यता असल्याने या प्रभागातील खुल्या गटातील उमेदवारांची चिंता वाढली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागा जेथे राखीव झाल्या आहेत, त्या प्रभागात ओबीसीकरिता आरक्षण काढले जाणार नाही. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात येणार आहे. खुल्या गटातील ५६ महिलांकरिता आणि ५८ जागा खुल्या गटातील उमेदवारांना ठेवल्या जाणार आहेत. पाच जागा अनुसूचित जाती आणि एक जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला यापूर्वीच राखीव ठेवण्यात आली आहे तर सात जागा ओबीसीसाठी राखीव ठेवली जाणार आहे, असे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.