तीक्ष्ण मांज्याने जखमी शाहीन फाल्कनची सुटका

ठाणे: ठाणे येथील चंदनवाडी येथील चांदीवाला कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी एक प्रौढ शाहीन फाल्कन पक्षी पतंगाच्या मांज्यात अडकलेला आढळून आला. तो अनोळखी पक्षी पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आवर्जून घटनास्थळी भेट देत होते.

शाहीन फाल्कन, पेरेग्रीन फाल्कनची एक उप-प्रजाती आहे. शिकार पकडण्यासाठी हा पक्षी आकाशातून ताशी 300 किमी वेगाने झेप घेतो.

या पक्षाची माहिती मिळताच वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (WWA) चे रेस्क्यू हेड अभिजीत मोरे यांनी त्याला वाचवले. या पक्ष्याच्या डाव्या पंखाला खोलवर जखम झाली होती. ही जखम तीक्ष्ण मांजामुळे झाली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आम्ही त्याला सुस्थितीत आणण्यासाठी सर्वोत्तम उपचार करत आहोत, असे ते म्हणाले.

पतंग उडवण्याचा हंगाम अनेकांना आनंद देतो, परंतु दुर्दैवाने, तो पक्ष्यांसाठी मोठा धोका देखील निर्माण करतो. पतंगाचा मांजा बहुतेकदा काच किंवा धातूने लेपित केला जातो. त्यामुळे पक्ष्यांना गंभीर दुखापत होऊन प्रसंगी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. जखमी झालेले कोणतेही पक्षी आढळून आले तर स्थानिक वन विभाग किंवा हॅलो फॉरेस्टच्या 1926 या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनचे रोहित मोहिते यांनी केले आहे.