नवी मुंबई : पावसाळ्यात पर्यटन स्थळांवर बंदी असून देखील काही हौशी पर्यटक नियम धाब्यावर बसवत खुश्कीच्या मार्गाने धबधब्यांवर जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात. अशीच घटना रविवारी नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर ८ येथील डोंगरात घडली आहे.
रविवारी सीबीडी सेक्टर ८ बी दुर्गा माता पुढील धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. मात्र सकाळी ११ नंतर पावसाचा जोर वाढल्याने या ठिकाणी ६० पर्यटक अडकले. याची माहिती नवी मुंबई महानगर पालिका आपत्कालीन कक्षाला मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांना बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर या ६० पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, उपायुक्त शरद पवार व सहाय्यक आयुक्त अमोल पालवे उपस्थित होते. सीबीडी बेलापूरप्रमाणेच पावणे एमआयडीसी भागात देखील पावसात अडकलेल्या दोन नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा जोर पाहता व बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन यावेळी आयुक्त डॉ.कैलास.शिंदे यांनी केले आहे.