महामार्ग पोलिस बनले देवदुत
मुरबाड: अचानक आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन माळशेज घाटातील धबधब्याखाली तब्बल 15 पर्यटक अडकून पडले. टोकावडे पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी या पर्यटकांची सुरक्षितपणे सुटका केली.
दरवर्षी पर्यटनावर दरडीचे सावट असताना धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढू लागल्याने पर्यटक अडकून पडल्याची घटना रविवारी माळशेज घाटात घडली आहे. रविवारी माळशेज घाटातील धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी अनेक पर्यटक आले होते. एका पॉइंटजवळील धबधब्याखाली जवळपास १५ पर्यटक आंघोळ करीत होते त्यात १ वर्षांचा लहान मुलगा व दोन लहान मुले ही आंघोळीचा आनंद लुटत होते. मात्र धबधब्याच्या पाण्याचा डोंगरावरुन अचानक प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटक प्रचंड घाबरले. याचवेळी उमरोळी माळशेज महामार्ग पोलिस या भागात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांनी ते दृश्य पाहून अडकलेल्या त्या पर्यटकांना पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूने एक एक करून सुखरूपपणे सुरक्षितस्थळी आणून सोडले.
माळशेज महामार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल विसपुते, पोलिस शिपाई भोई, जाधव, कोकाटे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.