नवी दिल्ली : आयपीएल २०२२च्या लिलावानंतर सर्व संघ १५व्या हंगामाची तयारीसाठी लागले आहेत. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल सुरूवात होण्यास ५ आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे.
आयपीएलच्या गेल्या हंगामात डेव्हिड वॉर्नरवरून चर्चेत आलेला हैदराबादचा संघ पुन्हा एकाद वादात अडकला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सायमन कॅटीचने सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी नुकतेच हे पद स्विकारले होते. कॅटीच यांनी संघावर आरोप केला आहे की, आयपीएलच्या मेगा लिलावात आधी निश्चित करण्यात आलेल्याप्रमाणे गोष्टी केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे नाराज होत त्यांनी राजीनामा दिलाय. हैदराबाद संघाने या वर्षी लिलावात २० खेळाडूंना खरेदी केले.
हैदराबाद संघ गेल्या हंगामात डेव्हिड वॉर्नर सोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. स्पर्धा सुरू असताना वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. इतक नाही तर अखेरच्या काही सामन्यात त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. गेल्या हंगामापासून आतापर्यंत ट्रेवर बेलिस आणि ब्रॅड हॅडिन यांनी पद सोडले आहे. १५व्या हंगामात टॉम मूडी संघाचे कोच असतील तर केन विलियमसनकडे कर्णधारपद असेल. गेल्या हंगामात वॉर्नरकडून पद काढून घेण्यात आले होते. हैदराबादने या हंगामापासून वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लाराला देखील सपोर्ट स्टाफमध्ये घेतले आहे.
आयपीएल २०२१ मध्ये हैदराबादची कामगिरी अतिशय खराब झाली होती. १४ पैकी फक्त ३ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला होता. ते गुणतक्त्यात आठव्या स्थानवर होते. या हंगामासाठी त्यांनी केन, अब्दुल समद, उमरान मलिक यांना रिटेन केले.