कळवा रुग्णालयातील चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिना उलटूनही चौकशी समितीचा अहवाल आलेला नाही. हा अहवाल अंतिम टप्प्यात आला असून केवळ अधिकारी कार्यक्रमात व्यस्त असल्याने प्रक्रिया लांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ही घटना घडल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात येऊन चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थापन झालेली चौकशी समिती १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र महिना उलटूनही अहवाल सादर करण्यात आला नसल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार २५ ऑगस्टपर्यंत अहवाल येणे अपेक्षित होते. त्यानुसार कारवाई देखील केली जाणार होती. परंतु २५ ऑगस्टनंतर पुन्हा १० दिवसांचा अवधी जाईल असे सांगण्यात आले होते. आता ते १० दिवसही उलटून गेले आहेत. दरम्यान सध्या राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा केंद्राच्या आयुष्यमान भव या कार्यक्रमासाठी तयारी करीत आहेत. त्यात चौकशी समितीमधील अधिकारी देखील व्यस्त झाले असल्याने अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.