ठाणे-बेलापूर रस्त्यावर १६ आय गर्डर्स स्थानापन्न

ऐरोली काटई नाका प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार

ठाणे: एमएमआरडीएच्या टीमने काल ऐरोली-काटई नाका प्रकल्पाच्या पहिल्या भागातील शेवटच्या पीएससी आय गर्डरच्या उभारणीसह या भागातील सर्व गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण केले. ठाणे बेलापूर रोडवर भारत बिजली जंक्शन ऐरोली येथील एकूण १६ पीएससी आय गर्डर लॉन्च करण्यात आले.

हे गर्डर २३ ते २८ मीटर लांबीचे असून प्रत्येक गर्डरचे वजन जवळपास ४८ मेट्रिक टन इतके आहे. सुमारे २५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेनच्या साहाय्याने गर्डर लाँच कले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी दोन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आले. पहिला ब्लॉक २५ व २६ मार्च आणि दुसरा ब्लॉक २९ व ३० मार्च दरम्यान रात्री १०:३० ते सकाळी ६ या कालावधीत घेण्यात आला.

कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई दरम्यान अखंड तसेच वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने १२.३ किलोमीटरचा ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्प एमएमआरडीए बांधत आहे.

ऐरोली-काटई नाका प्रकल्प मुलुंड-ऐरोली पुलापासून सुरू होऊन ठाणे-बेलापूर मार्गे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई नाक्यापर्यंत विस्तारला आहे. यामुळे वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल आणि सुलभता मिळेल तसेच कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या भागात वाहतूक कोंडी कमी होईल.

१२.३ किमी लांबीचा हा प्रकल्प तीन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागात ठाणे-बेलापूर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (जुना मुंबई पुणे महामार्ग) दरम्यान ३.४३ किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश आहे.

पहिल्या भागात ३+३ मार्गिकांसह १+१ रेफ्युज मार्गिकेचा १.६९ किमी लांबीचा दुहेरी बोगदा असून उर्वरित रस्ता उन्नत आणि सामान्य रस्ता असेल. या भागातीलतील उन्नत मगीर्केचे काम ९२ टक्के पूर्ण झाले आहे तसेच बोगद्याचे ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

दुस-या भागात २.५७ किमीचा संपूर्ण उन्नत रस्ता असेल जो मुलुंड-ऐरोली पुलाला ठाणे-बेलापूर रोडला जोडेल. या भागातील सुमारे ६७.५टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या तिसऱ्या भागात कल्याण-शीळ रोड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाका यांना जोडणारा ६.३० किमीचा पूर्ण उन्नतमार्ग असणार आहे.

“एमएमआरडीएच्या टीमने ऐरोली-काटई नाका प्रकल्पात पहिल्या भागातील ऐरोली बाजूचा शेवटचा पिएससी आय गर्डर लॉन्च करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यामुळे आता प्रकल्पातील पहिला भाग हा दुसऱ्या भागासोबत जोडला जाईल. प्रकल्प पहिला भाग पूर्णत्वाच्या मार्गावर असून डेक स्लॅब, एसीबी, कोटिंग करणे, पेंटिंगची कामे प्रगतीपथावर आहेत, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले.