ठाणे: मागील आठवड्यात रेंटल इमारतीच्या डक्टमध्ये आग लागली होती. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील रहिवाशांकडून महापालिका वर्षाला सुमारे पाच कोटी भाड्यापोटी वसुल करते, मात्र देखभाल दुरुस्तीसाठी केवळ दोन कोटींचा खर्च केला जातो, त्यामुळे या रहिवाशांची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.रस्ता रुंदीकरणात तसेच ठाणे महापालिकेच्या विकासकामांसाठी आपली राहती हक्काची घरे सोडून ठाणे महापालिकेच्या रेंटल इमारतींमध्ये स्थलांतरित रहिवाशांकडून भाड्यापोटी वर्षाला तब्बल चार ते पाच कोटी वसूल करते. त्या तुलनेत या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी मात्र केवळ दोन कोटींचीच तरतूद करण्यात येते. लिफ्ट वारंवार बंद पडणे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे अनेकदा जिन्याचा वापर करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत. आता आग लागण्याच्या घटना घडू लागल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्नी सुरक्षाकरिता केलेल्या उपाययोजनांची देखभाल दुरुस्ती वेळेवर होते का, येथिल यंत्रणा कार्यान्वित आहेत का, याची तपासणी होत नसल्याची माहिती अनेक रहिवाशांनी दिली. रेंटल इमारतींची दुरावस्था पाहता तरतूद करण्यात आलेला निधी तरी या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे बदलाची हाक दिली आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहराचाच चेहरामोहरा बदलण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरु केले आहे. तशा प्रकारचे अपेक्षित बदलही ठाण्यात दिसू लागले आहेत. मात्र ठाणे महापालिकेच्या विकासकामांसाठी आपली राहती घरे देऊन रेंटलमध्ये राहत असलेले सर्वसामान्य नागरिक अजूनही दुर्लक्षित आहेत. ठाण्याचा झपाट्याने चेहरामोहरा बदलण्यात व्यस्त असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच ते कोणत्या अवस्थेत या रेंटल इमारतींमध्ये राहत आहेत, या त्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांनी जाणून घ्याव्यात अशी मागणी इमारतीमधील रहिवाशांनी केली आहे. वर्तकनगर, मानपाडा, बाळकूम, खोपट, अशा ठिकाणी रेंटलच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या सर्वच ठिकाणच्या असुविधांमुळे या रेंटलच्या इमारतींमध्ये राहणे देखील नागरिकांना कठीण झाले आहे. मानपाडा येथील रेंटलच्या इमारतींमधील सुविधांसाठी नागरिकांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरु असून प्रशासनाने मात्र आतापर्यंत या सर्व समस्यांकडे दुर्लक्षच केले आहे. पालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. काही ठिकाणी पाण्याचे पाईप फुटले आहेत तर इमारतींच्या परिसरात अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींचीही अतिशय दुरावस्था असून नागरिक अक्षरशः या इमारतींमध्ये आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या मोहिमेत शहरातील रस्त्यांचा कोट्यवधी रुपये खर्च करून एकाच वेळी विकास केला आहे. सौंदर्यीकरणाची कामेही पूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नरकयातना भोगणाऱ्या नागरिकांकडे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
रेंटल इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १७ कोटींचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केला होता. मात्र यातील एक रुपयाचा निधी देखील देखभाल दुरुस्तीसाठी मिळाला नसून हा प्रस्ताव केवळ कागदावरच आहे. खर तर देखभाल दुरुस्तीसाठी शहरातील सर्व रेंटलच्या इमारतींसाठी १५ ते १६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र वर्षाला केवळ दोन कोटींचाच निधी मिळत असल्याने हा तिढा अजूनही सुटलेला नाही.