ठाणे: लोकसभागातून लोककल्याण या संकल्पनेतून आमदार संजय केळकर यांनी केलेल्या आवाहनानंतर आदर्श नाले दत्तक योजनेला मूर्त रूप आले तर आता रया गेलेल्या नौपाड्यातील घाणेकर उद्यानाने कात टाकल्याने उद्यानात पुन्हा लहान मुलांची किलबिल सुरू झाली आहे. याबाबत सुप्रसिद्ध विकासक महेश बोरकर यांनी पुढाकार घेतला.
ठाण्याच्या नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर हॉलसमोर असणाऱ्या घाणेकर उद्यानाची दुरावस्था झाली होती. उद्यानाची खेळणी तुटलेल्या अवस्थेत होती. उद्यानाला संरक्षक भिंत नव्हती, उद्यानात खड्डे पडले होते, स्वच्छतेचा अभाव, अशा दारुण अवस्थेमुळे या उद्यानाकडे पाठ फिरवत नागरिक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत होते.
आमदार संजय केळकर यांनी लोकसहभागातून लोककल्याण या संकल्पनेनुसार लोकसहभागातून आदर्श नाले दत्तक योजना राबवली होती. या संकल्पनेला प्रतिसाद देत ठाण्यातील सुप्रसिद्ध विकासक बोरकर रिॲलिटीजचे महेश बोरकर यांनी नौपाडा येथील घाणेकर उद्यानाच्या नूतनीकरणाची तयारी दर्शवत श्री. बोरकर आणि माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे चर्चा केली. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी श्री. केळकर यांच्या हस्ते या उद्यानाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता.
सद्यस्थितीत घाणेकर उद्यान विविध सोयी-सुविधांनी युक्त असे तयार करण्यात आले असून नवीन खेळणी लहान मुलांसाठी बसवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने उद्यानात ओपन जिम तयार करण्यात आली आहे.
या उद्यानाचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे ठामपा उद्यान अधीक्षक केदार पाटील, विद्युत विभागाचे उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, वृक्ष प्राधिकरणाचे श्री.धावडे, विद्युत विभागाचे अभियंता श्री.इंगळे, बोरकर रिऍलिटीजचे महेश बोरकर
नंदिनी बोरकर-सारंगधर, विभव बोरकर, अनिकेत बोरकर तसेच
भाजप पदाधिकारी मंगेश ओक, शंकर मेंडन, राजेश ठाकरे, सुशांत पाठक, जयंत जोगळेकर, विनायक पाध्ये उपस्थित होते. यावेळी परिसरातील गृहसंकुलातील पदाधिकारी व नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील शेकडो नागरिकांना या उद्यानामुळे मनोरंजनाची आणि आरोग्याची सोय झाल्याने त्यांनी आभार मानले.