शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या रेखा शिंदे यांचा दरारा

ठाणे : शरीरसौष्ठव क्षेत्र हे सामान्यपणे पुरुषांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. फार कमी महिला या क्षेत्रात करिअर घडवताना दिसत आहेत. मुंब्रा पोलीस स्थानकातील महिला पोलिस रेखा शिंदे यांनी मात्र या क्षेत्रात चांगलाच दरारा निर्माण केला आहे.

रेखा शिंदे यांनी नुकताच मुंबई श्री आणि महाराष्ट्र श्री किताब पटकावला असून या आधी नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय पोलिस शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या आधी ठाणे पोलीस मुख्यालयात सेवा करणाऱ्या रेखा शिंदे या सध्या मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. विटावा येथे कुटुंबासह राहणाऱ्या रेखा शिंदे यांना एक मुलगा असून तो इयत्ता दहावीत आहे. त्यांनी कला शाखेत पदवी संपादन केली आहे. पोलिस खात्यात काम करताना शरीर सौष्ठव क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुटुंबाचे नेहमीच प्रोत्साहन असते, असे त्यांनी सांगितले. रेखाने पोलीस व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे पोलिस खात्याला त्यांनी प्रथम पसंती दिली. ही सेवा करतानाच शरीर सौष्ठव क्षेत्रात करिअर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कळवा येथील बॉडी फिट जिममध्ये त्या दररोज सकाळी दोन तास सराव करतात. प्रशिक्षक रोशन खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सराव करत आहेत.

समाजात महिलांना दुय्यम स्थानावर पाहणे मला आवडत नाही, तो माझा स्वभावही नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या-त्या क्षेत्रात महिलांनी भविष्य घडवायला हवे. या विचारांची जडणघडण माझ्यात असल्याने मी पोलीस विभागात कामगिरीचा आलेख उंचावतानाच शरीर सौष्ठव क्षेत्रात शिखर गाठण्याचा मनोदय रेखा शिंदे यांनी व्यक्त केला.

त्यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भारत श्री किताबासाठी रेखा शिंदे आणि त्यांचे प्रशिक्षक रोशन खराडे यांना बॉडी फिट जिमच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.