जुन्या विहिरींना जल-संजीवनी

६७ हून अधिक विहिरी पुनरुज्जीवित करण्यासाठी ५० कोटी

ठाणे: वाढती लोकसंख्या आणि दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर लहान जल स्त्रोतांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ओवळे-माजिवडे विधानसभा मतदारसंघातील ६७हून अधिक जुन्या आणि पडीक विहिरींना संजीवनी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आमदार प्रताप सरनाईक याच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील ६७ विहिरींचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ आज रविवारी करण्यात आला. लोकमान्य नगर पाडा नं. २ येथील शंकर मंदिराजवळील विहीर आणि साईनाथ मित्र मंडळाजवळील विहीर या दोन विहिरींचे भूमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले.
ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहते किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी टॅंकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुर्नजीवित कराव्यात, या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपले जावेत, भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. त्यासाठी सर्वच विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधीची आवश्यकता होती. त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे.
आजच्या वाढत्या नागरीकरणात शुद्ध पाणी ही काळाची गरज आहे. शहरात अनेक ठिकाणी पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. काही विहिरी १०० वर्ष जुन्या आहेत. काही ठिकाणी विकासकांनी विहिरी आपल्या कामासाठी बुजवल्या आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरीचा वापर होत आहे. काही भागात मूर्ती विसर्जनासाठी विहिरींचा वापर केला जातो. तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित केल्या गेल्या आहेत. अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण झाल्या असून पाण्याला दुर्गंधी येते. हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. पाण्याचे महत्व ओळखून नैसर्गिक स्त्रोत टिकवून ठेवणे आणि विविध संवर्धन प्रकल्प हाती घेणे आवश्यक असून त्यामुळे आता सर्व विहिरींचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जिवंत केले जातील व या पाण्याचा उपयोग नागरिकांना दैनंदिन जीवनात कसा होईल हे पाहिले जाईल, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा मतदारासंघातील लोकमान्यनगर, उपवन, येऊर, माजिवडा, कासारवडवली, मोघरपाडा, घोडबंदर रोड येथील काही पट्टा हा आदिवासी भाग असून येथे अनेक वर्षांपूर्वी महापालिकेची पाणी योजना नव्हती तेव्हा लोक पिण्यासाठी ह्या विहिरींचेच पाणी वापरायचे. त्यामुळे आता पुन्हा विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करून हे पाणी पिण्या योग्य बनविण्यास प्राधान्य दिले जाईल. लोक पिण्यासाठी नाही तर रोजच्या इतर कामांसाठी हे पाणी वापरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात सर्व विहिरींची खोदाई करून साफसफाई केली जाईल. विहिरी या पाण्याच्या स्थानिक नैसर्गिक स्त्रोत असल्याने त्यातील पाण्याचे झरे जिवंत केले जातील. जर कोणत्या विहिरीत सांडपाणी सोडले जात असेल तर ते बंद केले जाईल. म्हणजे विहिरींमधील जलप्रदूषण पूर्णपणे थांबवून तेथे विहिरीचे कठडे नव्याने बांधून, प्लास्टरिंग करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रील लावण्यात येणार आहे. तसेच या कामाचे वैशिठ्य म्हणजे विहिरींच्या वर जलशुद्धीकरण सयंत्र लावण्यात येणार आहे. हे यंत्र पूर्णतः सौर उर्जेवर चालणारे असेल. इनलेट पॅरामीटर्स वर आधारीत वॉटर ट्रीटमेंट प्लांटची रचना करण्यात येणार आहे. या यंत्रणेत वाळू गाळण्याची प्रक्रिया कार्बन फिल्टरेशन, अल्ट्रा फिल्टरेशन, यु.व्ही. प्रणालीचा समावेश केला आहे जेणेकरून विभागातील नागरिकांना दैनंदिन वापराकरिता योग्य असे पाणी उपलब्ध होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
भविष्यात पाण्याची गरज वाढतच राहणार आहे आणि पाण्याचे सर्व नैसर्गिक स्त्रोत टिकवून ठेवणे, पाण्याची बचत करणे आणि संवर्धन करणे हे आपले काम आहे. यासाठी माझ्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात भविष्याची गरज ओळखून हा संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. या विहिरींना संरक्षक जाळीही लावले जाईल. जेणेकरून त्यात कोणी कचरा टाकणार नाही किंवा पाणी प्रदूषित करणार नाही, असेही आमदार सरनाईक म्हणाले.
याप्रसंगी माजी नगरसेविका आशा डोंगरे, राजेंद्र फाटक, संदीप डोंगरे, जयेंद्र दरेकर, रामचंद्र गुरव, भगवान देवकते, संतोष ढमाले, राजेंद्र कांबळे, टीना डिसोझा, वैभवी दळवी, सौ. गुरव, रमेश सांडभोर, राकेश यादव, प्रकाश जिमन, किरण भुजबळ, दिलीप केंजळे, महादेव बोरकर, सुनील शिंदे, बाळू जाधव, मच्छिंद्र आहेर आदी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.