ठाण्यातील रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला

ठाणे: बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले आहेत.

आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की, “माझे आई-वडील, आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडते.

दिल्ली विद्यापीठातून कला शाखेच्या माध्यमातून अर्थ शास्त्रातील पुढील शिक्षण घेऊन आयएएस व्हायचे आहे, असे रेहान याने ठाणेवैभवला सांगितले. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणे हे माझे स्वप्न आणि ध्येय असल्याचेही तो म्हणाला.

सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या प्रा.श्रीमती रेवती श्रीनिवासन म्हणाल्या, आम्ही मुलांना फक्त अभ्यासक्रम शिकवत नाही तर त्यांची आकलन क्षमता वाढवून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवतो. पुस्तकाबाहेरील शिक्षण देऊन त्यांची प्रगल्भता वाढवतो. हुशार विद्यार्थी आणि कमजोर विद्यार्थी असे वर्गीकरण न करता सर्वांना सरसकट सारख्या गुणवत्तेचे शिक्षण देतो. परीक्षांमध्येही काटेकोरपणे गुण देतो, त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत त्यांना चांगले यश मिळते, असेही त्या म्हणाल्या.