केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे आश्वासन
ठाणे : रेल्वे रुळालगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन आणि रेल्वे यांच्यामध्ये समन्वय साधून पुनवर्सन केले जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिले.
ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात हजेरी लावली. रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडय़ा हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा सन्मान राखला पाहिजे. मात्र या मुद्यावरुनही काही जण संभ्रम निर्माण करु शकतात. मात्र रेल्वे यावर तोडगा काढत आहे, हे ठणकावून सांगा, असे उपस्थित भाजप नेते आणि नगरसेवकांना त्यांनी बजावले. बाधीत होणाऱ्यांसाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्य शासन आणि रेल्वे यांच्यात समन्वय साधून एकाही झोपडपट्टीधारकाला बेघर होऊ देणार नसून यावर लवकरच तोडगा काढला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे स्टेशन ऐतिहासिक स्थानक आहे, या ठिकाणाहून पहिली ट्रेन धावली होती, त्यामुळे हे स्थानक ऐतिहासिक असून त्याचा हेरीटेज दर्जा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले आहेत. याचा विकासही आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाणे स्थानकाचा विकास केला जाणार असून याचे श्रेय ठाणे शहर भाजपचेच आहे, त्यामुळे हे श्रेय तुम्हीच घ्या, ठाणेकरांना आणि इतरांनाही सांगा, शिवाय या स्थानकाचा कायापालट करण्यासाठी तुमच्या काही सुचना असतील, काही बदल करायचे सांगायचे असतील तर तशा सुचना जरुर कळावा असेही त्यांनी सांगितले.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट
राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना निवेदनही दिले. या निवेदनाद्वारे रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडीधारकांना कोणत्याही स्वरुपात अन्याय होणार नाही, त्यादृष्टीने विचार करण्याची मागणीही त्यांनी केली. मी गृहनिर्माण मंत्री असल्याने एसआरएच्या माध्यमातून विकास करु शकतो, त्यानुसार रेल्वे आणि गृहनिर्माण खाते एकत्र आले तर येथील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.