कारभार सुधारा अन्यथा जेलमध्ये जावे लागेल

आ. प्रताप सरनाईकांचा उपनिबंधकांना इशारा

भाईंदर: खासगी इसमांद्वारे उपनिबंधक कार्यालयाचा कारभार हाकणाऱ्या उपनिबंधक सतीश देवकाते यांच्या कार्यालयात अचानक आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी भेट दिली. अवघे चार कर्मचारी व तीन खाजगी व्यक्ती कार्यालयात उपस्थित असल्याचे निदर्शनास येताच कारभार सुधारा अन्यथा नुसतेच घरी नाही तर जेलमध्ये जावे लागेल असा गर्भित इशारा उपनिबंधक सतीश देवकाते यांना आ. सरनाईक यांनी दिला.

सहकारी संस्था ठाणे तालुका यांच्या भाईंदर पश्चिमेकडे असलेल्या कार्यालयात मनमानी कारभार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येऊनही उपनिबंधक सतीश देवकाते यांच्या कारभाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संरक्षण प्राप्त झाले होते. आठवड्यातून एखाद्या मंगळवारी कार्यालयात उपस्थित असलेल्या उपनिबंधक देवकाते यांच्या कार्यालयात खाजगी व्यक्ती शासकीय दस्तऐवज व संगणकाचा वापर करीत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना साहेब, बाहेर गेले आहेत. असा निरोप देत परत पाठवित होते. काही महिन्यांपूर्वी कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या पती पत्नी विरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करीत कलम ३५३ चा गुन्हा भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने पती पत्नी ला पोलीस कोठडीचा अनुभव घेणे भाग पडले होते. उपनिबंधक कार्यालयात शासन राजमुद्रा लावून शासन आदेशाचा अवमान करीत खाजगी व्यक्तींचा वावर दिवसाढवळ्या राजरोस सुरू ठेवला होता. दुपारी २-३० च्या सुमारास आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता जैन यांनी उपनिबंधक सतीश देवकाते यांच्या कार्यालयास अचानक भेट दिली असता चार शासकीय कर्मचाऱ्यांसह तीन खाजगी व्यक्ती कार्यालयात कार्यरत असल्याचे दोन्ही आमदारांच्या निदर्शनास आले. उपनिबंधक सतीश देवकाते कार्यालयात येताच दोन्ही आमदारांनी उपनिबंधक देवकाते च्या कारभाराचा जागीच पंचनामा करीत कारभार सुधारा अन्यथा आम्ही मनात आणले तर तुम्हाला नुसतेच घरी नाही तर जेल मध्ये जावे लागेल” असा इशारा उपनिबंधक देवकाते यांना आ. प्रताप सरनाईक यांनी दिला.