टिटवाळा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार अमृत भारत स्टेशन योजनांची निर्मिती केली जात आहे. या स्टेशनांमध्ये स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार असून टिटवाळा येथील श्री महागणपतीच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, अशी सूचना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाच्या विविध भागातील २१ हजार ५२० कोटी रुपयांच्या १५०० रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण आज पार पडले. त्याचबरोबर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ५५३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणीही करण्यात आली. या योजनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकांचा समावेश असून, प्रवाशांच्या सुविधांसाठी ४१ कोटी २५ लाखांची कामे केली जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने कल्याण-इगतपुरी मार्गावरील रेल्वे अंडरपास क्र. ५३ व क्र. ७६, खडवली ते वासिंद दरम्यान अंडरपास क्र. ५९ यांचे लोकार्पण, तर कल्याण-इगतपुरी मार्गावर रेल्वे उड्डाणपूल क्र. ५५ व क्र. ६५ यांचे भूमिपूजन केले. टिटवाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह व्यासपीठावर मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक (प्रशासन) शशीभूषण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाला वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन पांचाळ, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, शक्तिवान भोईर, प्रदीप भोईर यांची उपस्थिती होती.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वासिंद-आसनगाव दरम्यानच्या आरओबीसाठी २९ कोटी ९२ लाख, टिटवाळा येथील खडवली येथील आरओबीसाठी ३ कोटी ९४ लाख, राळेगाव येथील आरओबीसाठी २८ कोटी ४३ लाख रुपये, टिटवाळा येथील अंडरपाससाठी ४ कोटी २१ लाख रुपये आदी सात कामांना निधी मंजूर झाला आहे. येत्या २०२५ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर या भागात रेल्वे फाटकावर प्रवाशांना तिष्ठत बसावे लागणार नाही, असे प्रतिपादन श्री. कपिल पाटील यांनी केले.
दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजना विषयावर रेल्वेतर्फे टिटवाळा स्टेशन मॅनेजर श्री. झा यांनी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धांमधील विविध गटांतील ६० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत एंजल सागर पोळ याने लिहिलेल्या निबंध हा सर्वोत्कृष्ट ठरला.