कोपरीतील अंधश्रद्धा प्रकारांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण
ठाणे: ठाणे पूर्व मीठबंदर रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधली असून, ठिकठिकाणी जादूटोण्याचे उतारे देखील टाकलेले आढळून येत आहेत. या प्रकारामुळे फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण होत आहे.
ठाणे पूर्व परिसरात स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडे लावून त्यांची जोपासना केली आहे. झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे जादू टोण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. येथील सात ते आठ झाडांना लाल कपड्यात लिंब गुंडाळून लावली आहेत. अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला असला तरी या आघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली.
याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावर अज्ञात व्यक्तीने आघोरी कृत्य केल्याचे दिसून आले. या झाडावर सात ठिकाणी काळ्या रंगाच्या सात रिबीन बांधून तेथे पूजाअर्चा केली होती. या ठिकाणी काही वेळा लाल काळया कपड्यात उतारे देखील काढलेले असतात. त्यामुळें या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत न कळत भीती वाढताना दिसते.