ठामपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अवघे साडेसहा टक्के कमी
ठाणे: दिलेल्या उद्दीष्टाच्या शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी ठाणे महापालिकेला अवघ्या ६.५७ टक्के वसुलीची आवश्यकता असून आत्तापर्यंत महापालिकेने पाच हजार ५९४ कोटींची वसुली केली आहे. पुढील १९ दिवसांत लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना २३-२४ याआर्थिक वर्षाकरिता पाच हजार ९८८.८ कोटी इतके उद्दीष्ट दिले होते. त्याचा पाठलग करताना १० मार्चपर्यंत शहर विकास विभागाने सर्वाधिक ६९४ कोटी इतकी वसुली केली आहे. ही वसुली दिलेल्या उद्दिष्टापेक्षा चार टक्के जास्त आहे.
मालमत्ता कर विभागाने मागील वर्षी सर्वाधिक वसुली केली होती, परंतु या वर्षी मात्र त्यांना दिलेले उदिष्ट पूर्ण करण्यात यश येण्याची शक्यता कमी आहे. या विभागाला ७३८ कोटी ७७ लाख इतके उद्दिष्ट दिले असून या विभागाने आत्तापर्यंत फक्त ५५२ कोटी तीन लाख इतकी वसुली केली आहे. ही वसुली ७४ टक्के आहे. पाणी पुरवठा विभागाची वसुली समाधानकारक नाही. त्यांनी अवघे १०२ कोटी इतकी वसुली केली आहे. ही वसुली आवाघी ६४ टक्के असून त्यांना पुढील १९ दिवसांत ३६ टक्के वसुली करावी लागणार आहे. अग्निशमन विभागाने ८६ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाने २८.५७ कोटी इतके उत्पन्न मिळवले आहे. जाहिरात विभागाने १० कोटी तीस लाख, स्थावर मालमत्ता विभागाने आठ कोटी चार लाख आणि इतर विभागाकडून ७३ कोटी ७९ लाख असे एकूण स्वतःचे म्हणजे १५५६ कोटी ८७ लाख इतके उत्पन्न मिळवले आहे. हे प्रमाण ८६.०३ टक्के एवढे आहे. राज्य शासनाकडून जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटीचे ११७७ कोटी ५७ लाख इतके अनुदान मिळाले आहे इतर अनुदान १०८४ कोटी ४९ लाख इतके प्राप्त झाले आहे. अनामत रक्कम ४७ कोटी ८९ लाख असे एकूण तीन हजार ८६६ कोटी ८२ लाख आणि मागील शिल्लक एक हजार ७२७ कोटी ६७ लाख असे एकूण उत्पन्न पाच हजार ५९४ कोटी ४९ लाख महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
यावर्षी महापालिकेने कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा कर्ज रोखे घेतले नाहीत. मागील अनेक वर्षाची ठेकेदारांची देणी फेडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.