ठाणे: महापालिकेचे महत्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर. यावर्षी महापालिकेने मागील संपूर्ण वर्षभरात जी वसुली केली होती ती वसुली यंदा जानेवारी 2023 अखेरपर्यत पूर्ण केली आहे.
आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी कर भरणा केल्याने आयुक्तांनी ठाणेकर करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अजूनही दोन महिने बाकी असून ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी त्वरीत भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे असेही त्यांनी नमूद केले आहे.
मालमत्ता कराचा भरणा वेळेवर व्हावा यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते व त्यानुसार योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती तसेच ऑनलाईन प्रणाली सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती.
आयुक्त श्री. बांगर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणेकरांनी मालमत्ता कराचा भरणा केल्याने मागील वर्षीच्या तुलनेत जानेवारी 2023 अखेरीस महापालिकेने 110 कोटीचा अधिकचा मालमत्ता कर वसुल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
यावर्षी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत ५९१ कोटी रुपये मालमत्ता कर वसुल झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्च २०२२ पर्यंतची वसुली ५९१ कोटी होती, ती या वर्षी जानेवारी महिन्यातच पूर्ण केली आहे, त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ११० कोटींनी अधिकचा मालमत्ता कर वसुल झालेला आहे.
यामध्ये चालू वर्षी उथळसर प्रभाग समिती 39.88 कोटी, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती 72.26 कोटी, कळवा प्रभाग समिती 20.46 कोटी, मुंब्रा प्रभाग समिती 24.31 कोटी, दिवा प्रभाग समिती 26.78 कोटी, वागळे इस्टेट प्रभाग समिती 19.53 कोटी, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती 22.99 कोटी, वर्तकनगर प्रभाग समिती 84.65 कोटी, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती 206.37 कोटी व मुख्यालयाकडे 75.66 कोटींची वसुली झाली आहे.