नवी मुंबईत बेशिस्त वाहनचालक वाढले

नवी मुंबई: नवी मुंबई आरटीओमार्फत बेशिस्त वाहन चालकांवर नित्याने कारवाई करण्यात येत असते. मागील वर्षभरात तब्बल १४,७९७ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १०,३३८ जणांकडून सुरक्षित वाहतूक नियमांना हरताळ फासण्यात आला आहे. त्यांच्याकडून ३३८.८७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
दरवर्षी साधारण ३ ते ४ हजार वाहन चालकांवर अशी कारवाई करण्यात येते. मात्र मागील वर्षी यात कमालीची वाढ झाली असून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान आरटीओ विभागाकडून तब्बल १४,७९७ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १०,३३८ जणांकडून सुरक्षित वाहतूक नियमांना हरताळ फासून वाहने चालवित असण्याचे समोर आले आहे. अशा वाहन चालकांवर वाशी आरटीओने कारवाईचा बडगा उगारला असून ३३८.८७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
सर्वाधिक कारवाई ही विना हेल्मेट आणि योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विना सीट बेल्ट इत्यादी त्रुटी असणाऱ्या वाहनांवर करण्यात आलेली आहे. उर्वरित चार हजार वाहन चालकांकडून विनापरवाना, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, अवैध वाहतूक, अवजड वाहतूक इत्यादी नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक नियम तोडत असल्याने नवी मुंबई शहरात वाहन अपघातात वाढ होताना दिसत आहे. त्याअनुषंगाने असे अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात १४ हजाराहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये सुरक्षित वाहतूक नियम मोडणाऱ्या १०,३३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.