अलीकडे आणि पलीकडे फॉर्म्युला राष्ट्रवादीला लाभला, सेनेला बाधला

ठाणे: खाडीच्या अलिकडे आणि पलिकडे या फॉर्म्युल्यावर ठाणे महापालिकेने जाहिर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र हा फॉर्म्युला राष्ट्रवादीला चांगलाच लाभला असून शिवसेनेला बाधल्याचे दिसत आहे.

अंतिम प्रभाग रचनेतही  सुरुवातीला मांडण्यात आलेल्या लोकसंख्येच्या गणितानुसार खाडीच्या अलिकडे मूळ शहरात ९० तर पलिकडे उपशहरात ५२ नगरसेवकांची संख्या जैसे थे राहणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून प्रारुप आराखड्यावरून रणकंदन माजवत शहरात नगरसेवकांचे संख्याबळ वाढवून घेण्यास शिवसेनेला सपशेल अपयशच आले आहे. राष्ट्रवादीने मात्र बाजी मारली आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम प्रभाग रचना आराखडा काल जाहीर करण्यात आला. हा आराखडा ‘मनासारखा’ असेल अशी शिवसेनेला अपेक्षा होती. किंबहूना त्यासाठी पालकमंत्री, माजी महापौरांसह शिवसेनेचे स्थानिक नेते प्रयत्नशील होते. म्हणूनच सुरुवातीला जाहिर झालेल्या प्रारुप आराखड्याला जोरदार विरोध शिवसेनेकडून करण्यात आला आणि खाडीच्या अलिकडे-पलिकडे या सिद्धांतालाच आक्षेप घेण्यात आला. या प्रारुप आराखड्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हस्तक्षेप केला असल्याचा संशय व्यक्त करत माजी महापौर नरेश म्हस्के यांनी या आराखड्यात दुरुस्ती न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते.  तर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी हिंमत असेल तर ‘पहिला’ नकाशा दाखवा असे आव्हान दिले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन आरोप- प्रत्यारोपाने राजकीय वातावरण तापले होते.

राजकीय वातावरण तापत असताना ठाणे शहरातील आणि दिव्यात नगरसेवक संख्या वाढवून घेण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहिली. त्यापैकी दिव्यात एक नगरसेवक वाढवून घेण्यात यशही मिळाले आहे. पण वागळेच्या मुद्दयावरून शिवसेना बॅकफुटवर गेल्याचे दिसते.

दिव्यात नवीन प्रभाग रचनेनुसार १० चे आठ नगरसेवक होणार होते. त्यात बदल करून अंतिम आराखड्यात आता दिव्यात नगरसेवकांची संख्या नऊ होणार आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघात नगरसेवकांची संख्या एकने वाढणार आहे. कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील प्रभागांमध्ये बदल करून हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र असे करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील नगरसेवक संख्येला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. या मतदारसंघात वाढवण्यात आलेल्या सहा नगरसेवकांची संख्या कायम राहणार असून ४४ नगरसेवक निवडून येणार आहेत. वागळेतील ३३ नगरसेवक असताना सर्वाधिक ४४ नगरसेवक मुंब्रा-कळव्यातून निवडून येणार असल्याने राष्ट्रवादीचे महापालिकेतील स्थान आणखी भक्कम होणार आहे.

राष्ट्रवादीकडून धोबीपछाड
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वागळे येथील एका प्रभागाचा विस्तार करून तेथे चार नगरसेवकांचा पॅनल करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा होता. त्यासाठी शिवसेनेने जोर लावला होता. पण अंतिम प्रभाग रचनेत तसा कोणताही बदल झाला नसल्याने अंतीम प्रभाग रचनेवर पालकमंत्री नाराज असल्याचे समजते. उलट मुंब्य्रातील नगरसेवकांची संख्या कायम ठेवण्यासाठी प्रभाग क्रमांक ४२ चार पॅनलचा करण्यात आला आहे. पूर्वी दिव्यातील प्रभाग क्रमांक ४४ हा चार पॅनलचा होता. राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेली ही चपराक आहे, असे बोलले जाते.