रेडी रेकनरची छुपी दरवाढ; ठाण्यात घरखरेदी महागणार

२० टक्क्यांनी घरांच्या किमती वाढणार

ठाणे: राज्य सरकारने नवीन रेडीरेकनर दर ७.७२ टक्के वाढवला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो २०टक्के इतका असल्याने ठाण्यात घरखरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणार नाही. परिणामी ठाण्याच्या रियल इस्टेट उद्योगधंद्यात मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठाणे एमसीएचआयने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील जमिनीचा भाव १० टक्क्यांनी तर रहिवासी सदनिकांचा भाव २० टक्क्यांनी महागला आहे. सध्या ठाण्यामध्ये कमीत कमी परवडणारे घर ४०ते ५०लाखांच्या घरात आहे. हेच घर आता घ्यायचे असल्यास ग्राहकाला ६० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पाडव्यापर्यंत ठाण्यात जो घर खरेदीचा मूड होता तो आता कमी होण्याची शक्यता असून त्याचा फटका नवीन गृहप्रकल्पांना बसण्याची भीती विकासकांनी व्यक्त केली आहे.

करोनानंतर ठाण्यात घर खरेदीचा कल जास्त वाढला. दसरा, दिवाळीसारखे मुहूर्त साधत हजारो ग्राहकांनी घरांची बुकींग करून गृहप्रवेश घेतला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे एक हजार ग्राहकांनी स्वप्नातील घरात प्रवेश घेतला. तर ५०० हून अधिक घरांची विक्री झाली. शासनाने गेली दोन वर्षे रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे घरांचे भाव जैसे थे होते. वास्तविक प्रत्येक भागातील घरांच्या किंमतीचे रेडीरेकनर असले तरी प्रत्यक्षात कोणताच विकासक त्यानुसार घरांची किंवा सदनिकांची विक्री करत नाही. प्रत्येक परिसरातील भाव हे बिल्डरच्या सोयीसुविधांच्या तुलनेने कमीअधिक असतात. त्यानुसार ग्राहक आपल्याला परवडेल अशा घराची निवड करतो. यामध्ये प्रत्यक्ष घराची किंमत आणि नोंदणी शुल्क, जीएसटीचा समावेश केला जातो. त्यामुळे ग्राहकाला मूळ किमतीच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागतात. आता नवीन धोरणानुसार त्यामध्ये अधिक वाढ होणार असल्याने येत्या सणासुदीच्या मुहूर्तावर घरखरेदी रोडावणार असल्याचे संकेत विकासकांनी दिले आहेत.

शासनाने ठाणे शहराचा रेडीरेकनर सरासरी ७.७२ टक्के वाढवला आहे. मात्र प्रत्यक्षात लँड रेट म्हणजे जमिनीसाठी १० टक्के तर फ्लॅट रेट म्हणजे सदनिकांसाठी २० टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. याचा सारासार विचार केला असता फ्लॅटच्या किमतीवर किमान पाच टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या ठाणे शहरात ४०० गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. विकासक भुखंड विकत घेतो आणि त्यानंतर त्याचा विकास करत इमारती बांधतो. पण आता विकासकालाच भुखंड जादा १० टक्के मोजून मिळणार असल्याने त्याचा बांधकाम खर्च वाढणार आहे. ही वाढीव रक्कम अर्थातच तो ग्राहकांकडून वसूल करणार आहे. सध्या सुरू असलेल्या गृहप्रकल्पांवर त्याचा परिणाम होणार नसला तरी भविष्यात त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

*ठाणे शहरात एका वन बीएचकेची किंमत कोटीच्या घरात पोहचली आहे. शहरापासून दूर असलेल्या गृहप्रकल्पांमध्येही ५० लाख ते दीड, दोन कोटींची घरे उपलब्ध आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना सध्यातरी ही घरे परवडणारी नसली तरी ठाण्यात घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत होता. पण आता नवीन रेडीरेकनरमुळे केवळ ग्राहकांनाच नव्हे तर विकासकांनाही झळ पोहचणार असून ठाण्याच्या रिअल इस्टेट उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. घरे विकायची असतील तर विकासकांना लाभाचे मार्जिन कमी करावे लागणार आहे. पूर्वी भूमिपुजनाला घरांचे बुकींग होत असे. आता इमारतीचे पाच मजले चढल्यावर घरांची बुकींग होते. हा काळ आता आणखी वाढणार असून संपूर्ण इमारत तयार होईपर्यंत विकासकाला ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती ठाणे क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष
जितेंद्र मेहता यांनी दिली.