ठाणे कारागृहात बंदीवानाकरिता ई-ग्रंथालय
ठाणे : शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानांसाठी ठाणे कारागृहात ई-ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. तूर्तास २० संगणकांमध्ये विविध भाषेतील ९५० पुस्तके कैद्यांना वाचण्यासाठी उपलब्ध केली असून भविष्यात पाच हजार पुस्तके उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कारागृह अधिक्षक राणी भोसले यांनी सांगितले.
ठाणे मध्यवर्ती कारागृह ऐतिहासिक कारागृहांपैकी एक असून या कारागृहात आजघडीला क्षमेतेपेक्षा दुप्पट बंदिवान आहेत. यात जन्मठेपेपासून किरकोळ गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱ्यांचा समावेश आहे. तसेच महिला बंदी आणि कच्चे बंदी त्याचबरोबर तृतीयपंथी बंद्यांचा सुध्दा समावेश आहे.
कारागृहात चांगल्या गुणांची जोपासना होण्यासाठी बंद्यांना पारंपारीक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दु, गुजराती इत्यादी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची ई पुस्तके सध्यस्थितीत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील ग्रंथालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
ई- ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत. या तंत्राज्ञानाची कारागृहातील बंद्यांना देखील लाभ होऊन बंद्यांना जास्तीत जास्त पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा या हेतूने अप्पर महासंचालक, कारागृह महानिरिक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना ई- ग्रंथालयाच्या माध्यमातून पीडीएफ स्वरुपातील पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ई-ग्रंथाल याचे उदघाटन कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांच्याहस्ते व अधिक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले.
कैद्यांच्या आवडीनुसार पुस्तके
ई -ग्रंथालयमध्ये २० संगणकांच्या माध्यमातून प्राथमिक स्वरुपात मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या भाषेतील ९५० ई पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बंद्यांच्या मागणीनुसार, आवडीनुसार ५००० ई- पुस्तके बंद्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.