ठाणे – सोशल मिडियाला भरीस न जाता पुस्तक वाचनासाठी वेळ काढणे ही काळाची गरज आहे. त्याकरीता नगरवाचन मंदिर प्रयत्नशील आहे याचा आनंद असल्याची भावना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
सध्या १७० वर्षांची परंपरा असलेल्या नगर वाचन मंदिरात ५० हजाराहून अधिक ग्रंथसंपदा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष केदार जोशी म्हणाले. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रविवारी नव्याने नुतनीकरण करण्यात आलेल्या ठाणे नगर वाचन मंदिर ग्रंथालय आणि वातानुकूलित अभ्यासिकेचे उद्घाटन खासदार डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी भाषेविषयी बोलताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. पण त्याबरोबरच मराठी भाषेचा वापर नित्यनेमाने आपल्या जीवनशैलीत करण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना केले. तर संस्थेचे अध्यक्ष जोशी यांनी माजी अध्यक्ष नंदकुमार जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या अभ्यासिकेचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लिटील चॅम्प श्रध्दा वैद्य हिने लता मंगेशकर यांची गाणी म्हणत उपस्थितांची मने जिंकली. तर सूत्रसंचालक धनश्री दामले यांनी केले.