पुन्हा निविदा अन् पुन्हा बिल; झालेल्या रस्त्याचे संशयास्पद डील!

* चरई, धोबीआळी, उथळसर भागात रस्ते काँक्रीटीकरणाच्या निविदा
* माजी नगरसेवकाची चौकशीची मागणी

ठाणे: चरई, धोबीआळी, उथळसर भागातील रस्ते १०० टक्के काँक्रिटचे आणि चकचकीत असतानाही त्या रस्त्याचे पुन्हा काँक्रीटीकरण करण्याची निविदा काढून करोडो रुपयाची बोगस बिले काढण्याचा घाट घातला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चरई, धोबीआळी, डॉ. आंबेडकर, उथळसर, जोगीला मार्केट, मनोरपाडा, सामंतवाडी, लॉर्री स्टॅन्ड, आणि भोईर चाळ या भागातील रस्त्याचे युटीडब्लूटी पद्धतीने काँक्रीटीकरण करण्याची निविदा प्रसिद्धी केली आहे. या कामाकरिता पाच कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु ‘ठाणेवैभव’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली असता हे सर्व रस्ते काँक्रीटचे असून मागिल दोन ते तीन वर्षात ती कामे झाली आहेत. यापैकी कोणत्याही रस्त्यावर खड्डा नाही कि रस्ता खराबही नाही. डांबरी किंवा कच्चा रस्ता कुठेही नसताना या रस्त्यांच्या कामाचा घाट घातला असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत स्थानिक शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी या कामाबाबत लेखी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.नरेश म्हस्के महापालिका आयुक्त सौरभ राव आणि नगरअभियंता प्रशांत सोनग्रा यांच्याकडे केली आहे. ही कामे झालेली असून त्याची बिले देखिल महापालिकेने ठेकेदारांना दिली आहेत. तरी देखील या कामाची निविदा काढल्याबद्दल श्री.कोकाटे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी ठाण्यातील विकासासाठी विशेष निधी २०२२-२३ या साली मंजूर केला होता, परंतु त्यावेळी ही कामे करण्यात आली नाहीत. ही कामे राज्य सरकारच्या निधीतून मंजूर करण्यात आल्यामुळे त्याकडे कोणाचेही लक्ष जाणार नाही. निविदा काढून कामे न करताच जुनी कामे दाखवून बिले काढली जाणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिकेतील काही अधिकारी स्वतःच्या मालकीच्या बोगस कंपन्या काढून ठेकेदार बनले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी श्री.कोकाटे यांनी केली असून याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे महापालिका आयुक्त श्री. राव यांनी तक्रार करावी, अशी मागणी जागरुक नागरिकांनी केली आहे.