रेमंड-इंडियन रबर कामगारांच्या थकबाकीचा निर्णय आठवडाभरात

संयुक्त बैठकीत आ.संजय केळकर यांनी मांडली कामगारांची बाजू

ठाणे: बंद झालेल्या रेमंड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यवधींची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवडाभरात सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

थकबाकीपासून अनेक वर्षे वंचित आणि त्रस्त कामगारांनी आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडे घातल्यानंतर श्री.केळकर यांनी कामगार उपायुक्त कार्यालय, एमआयडीसी, महापालिका अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली. यावेळी श्री.केळकर यांनी कामगारांची बाजू हिरीरीने मांडली. इंडियन रबर कंपनीच्या ४५० कामगारांपैकी २०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच रेमंड कंपनीचे २५-३० कामगार या सर्व कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. थकबाकी दिली नसताना या कंपन्यांच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी ना हरकत दाखला कसा देण्यात येतो, असा गंभीर प्रश्न आ.केळकर यांनी यावेळी उपस्थित केला. यावर कामगार उपायुक्त यांनी कामगारांच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, क्लस्टरसाठी कंपनीची जमीन घेण्यात आली आहे. क्लस्टर हा विषय युती सरकारचा असला आणि तो निर्णय जनहिताचा असला तरी कामगार मित्र म्हणून मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा राहीन. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे. आजच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आठवडभरात योग्य निर्णय होईल, असा विश्वास श्री.केळकर यांनी व्यक्त केला तसेच याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली असल्याचे ते म्हणाले.