ठाणे: उद्योजक हे वर्षानुवर्ष काम करत असतात आणि ब्रँड डेव्हलप करतात. ब्रँड डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. ब्रँडला मनी मशीन म्हणून बघितले जाते. पण ब्रँड घडवणारे सुध्दा सामाजिक जबाबदारी घेणारे नागरिक असतात. त्यामुळे हा सन्मान खूप महत्वाचा आहे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘पितांबरी ब्रँड’ ची दखल घेऊन हा पुरस्कार मला प्रदान केला, याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे, असे प्रतिपादन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांनी केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४२ वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी मुकुंदनगर येथील टि.म.वि.च्या संकुलात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई, ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे व कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि.च्या संस्थापक व कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी टि.म.वि.च्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टि.म.वि. ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणिती टिळक, प्रभारी कुलसचिव सुवर्णा साठे, विश्वस्त सरिता साठे यांच्यासह विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. प्रा. अनुजा पालकर यांनी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मानपत्राचे वाचन केले.
ही पदवी मिळाल्यामुळे मनस्वी आनंद झाला असून सामाजिक योगदानासाठी याचा अधिकाधिक उपयोग करेन अशी भावनाही प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.
सनातन संस्थेची साधना करताना सच्चिदानंद परमपूज्य डॉ. जयंत आठवले यांनी ‘आध्यात्मिक बुद्ध्यांकाचे महत्व सांगितले. आपल्या प्रारब्धावरती आपल्या कर्माने आणि साधनेने मात करता येते हे त्यातूनच समजले. मॅनेजमेंटमधली प्रिन्सिपल आणि अध्यात्मातले प्रिन्सिपल बऱ्यापैकी जुळतात. साधना केल्याने बुद्धी सूक्ष्म होते, ज्याचा आपल्याला खूप फायदा होतो. हेच उद्योजकांना सांगण्यासाठी मी परमपूज्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात तीन सत्संग घेतले आणि ते घेऊन घरी परतल्यानंतर मला टिळक विद्यापीठातून ही पदवी मिळणार असल्याचे समजले आणि पुन्हा एकदा परमेश्वर आपल्या पाठीशी असल्याची अनुभूती मिळाली. असेही ते म्हणाले.
डॉक्टरेट मिळाल्यानंतर त्याचे विश्लेषण उद्योजकीय दृष्टीने रविंद्र प्रभुदेसाई यांनी केले. डॉक्टर (Doctor) या शब्दातील ‘डी’ म्हणजे ‘डिफ्रंशीएटर’ अर्थात आपले प्रॉडक्ट दुसऱ्यांपेक्षा वेगळं कसं असेल ते पाहणे, ‘ओ’ म्हणजे ‘ऑब्जेक्टीव’ आपल्या संस्थेचे ध्येय काय आहे ते लक्षात घेऊन काम करणे, ‘सी’ म्हणजे ‘Collectively’ अर्थात हा सन्मान केवळ माझ्या यशाचा भाग नाही तर संपूर्ण पितांबरी परिवाराचे त्यात एकत्रितपणे योगदान आहे. कारण आपल्या संकल्पनेला जेव्हा सर्वांकडून एकत्रितपणे स्वीकृती मिळते. तेव्हाच यश मिळतं. ‘टी’ – म्हणजे ‘टाईम मॅनेजमेंट’ म्हणजेच वेळेत सगळ्या गोष्टी पूर्ण होण याला अत्यंत महत्व आहे. पुढचा ‘ओ’ म्हणजे ‘ऑर्डर’. कोणतीही गोष्ट क्रमानेच पुढे झाली पाहिजे. शेवटचा ‘आर’ म्हणजे ‘रिझल्ट’ आपण जे काही कृतीत आणणार आहोत त्याला शंभर टक्के रिझल्ट आहेत का याची खात्री असली पाहिजे, असा वेगळा विचार त्यांनी मांडला.