ठाणे : शिधावाटप विक्री दुकानावर कारवाई करू नये यासाठी ४८ हजारांची लाच घेताना शिधावाटप निरिक्षकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. वरिष्ठ अधिकारी आणि इतर शिधावाटप निरिक्षकांकरीता त्याने ही लाच घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.
सागर साहेबराव वराळे असे लाच घेणाऱ्या शिधावाटप निरिक्षकाचे नाव आहे. ते नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयात शिधावाटप निरिक्षक (तपासणी) म्हणून काम करतात. ठाणे शहरात तक्रारदार यांची चार शिधावाटप विक्री दुकाने आहेत. या दुकानांवर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि इतर शिधावाटप निरिक्षक यांना प्रत्येक दुकानामागे दर महिना दोन हजार रुपये देण्याची मागणी सागर याने तक्रारदार यांच्याकडे केली होती.
दोन हजार रुपये प्रमाणे चार दुकानांचे सहा महिन्यांचा हप्ता म्हणून ४८ हजार रुपये देण्याची मागणी सागरने केली होती. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या आधारे पथकाने १९ मे रोजी पडताळणी केली. त्यात लाचेची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रुपाली पोळ यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून ४८ हजार रुपयांची लाच स्विकारताना पथकाने सागर याला अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.