कल्याणकारी योजनांसाठी उत्पन्न दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य

खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधील काही योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य अशी अट होती. सदरची अट रद्द करुन उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य धरण्यात येणार आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. श्री.राव यांनी शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचे मान्य केले असल्याने या योजनांचा लाभ आता जास्तीत जास्त महिलांना मिळणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी उत्पनाच्या दाखल्याची अट ठेवण्यात आली होती. परंतु या अटीमुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहत होत्या. त्यामुळे सदर अट शिथील करण्याबाबत संबंधित महिला व बहुतांशी माजी नगरसेवकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी दिनांक 8 जानेवारी रोजी आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र दिले होते. यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेवून शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहे.