ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनवर फुलले भाजपाचे कमळ

सीताराम राणे यांच्या समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी

ठाणे : ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या रविवारी पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत समर्थ सहकार पॅनेलने बाजी मारली. या निवडणुकीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा हाऊसिंग फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने हॅटट्रीक करून नवा इतिहास रचला.

सीताराम राणे यांच्या समर्थ सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा भरघोस मताधिक्याने जिंकत विरोधी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडवला. दरम्यान, २०२३ या वर्षातील ठाण्यातील पहिलीच निवडणूक जिंकून भाजपने दणक्यात श्रीगणेशा केल्याने भाजप जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे आणि आ.संजय केळकर यांनी रविवारी रात्रीच मतमोजणी केंद्रात धाव घेत सीताराम राणे आणि त्यांच्या पॅनेलमधील सर्व विजयी उमेदवारांचे गुलाल उधळुन अभिनंदन केले.

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या २१ जागांसाठी रविवारी (ता.८ जाने.) मतदान होऊन लगेचच निकाल जाहीर झाला. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा हाऊसिंग फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सीताराम राणे यांच्या समर्थ सहकार पॅनेल आणि महाविकास आघाडी पुरस्कृत सतनाम रसगोत्रा व जिल्हा बँकेचे शिवाजी शिंदे यांच्या परिवर्तन पॅनेलमध्ये या निवडणुकीत चुरस रंगली होती. समर्थ पॅनेलचे २१ उमेदवार तर, परिवर्तन पॅनेलचे १९ उमेदवार रिंगणात होते. समर्थ पॅनेलची निशाणी ‘कपबशी’ होती तर परिवर्तनची निशाणी ‘ऑटोरिक्षा’ होती.

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी रविवारी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला होता. प्रचारादरम्यान विरोधी पॅनेलने जाहिर पत्रकार परिषद घेत सीताराम राणे यांच्यावर व्यक्तीगत आरोपांच्या फैरी झाडून, गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही जाऊन कथित भ्रष्टाचाराची बोंब उठवली होती. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनीही परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांची भेट घेतली होती. मात्र,सुज्ञ मतदार बंधु भगिनींनी गेली १५ वर्षे फेडरेशनचे अध्यक्ष तसेच, महाराष्ट्र राज्य महासंघाचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या भाजपच्या सीताराम राणे यांच्या नेतृत्वावरच आपला मतरूपी विश्वास व्यक्त करून सलग तिसऱ्यांदा हाऊसिंग फेडरेशनची धुरा समर्थ पॅनेलकडे सोपवली.

या निवडणुकीत एकूण १२६० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी रात्री झालेल्या मतमोजणीत यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मते अवैध ठरली. तरीही तब्बल ७० टक्के अशी घसघशीत मते मिळवुन समर्थ सहकार पॅनेल विजयी झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी रामचंद्र लोखंडे यांनी केली. या निवडणुकीत हॅटट्रीक करून एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवल्याने सीताराम राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे, आ.संजय केळकर यांनी रात्रीच सीताराम राणे तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सोमवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विजयी पॅनेलचे अभिनंदन केले. हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत सहाय्य करणाऱ्या सर्व सहकारी, मित्रमंडळी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांचे सीताराम राणे यांनी आभार मानले आहेत.

समर्थ सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार

सीताराम राणे, ज्ञानु चोरगे, निंबा पाटील, रघुवीर पोतदार, शशिकांत मोरे, डॉ. राजाराम दळवी, विनोद देसाई, अविनाश राऊळ, भरत सुर्वे, विद्या चौधरी, आकांक्षा चौधरी, भगवंत हरणे, विठ्ठल जुवेकर, हिंदुराव गळवे, संतोष तावडे, संतोष साळुंखे, विद्या कदम, शैलजा गस्ते, राजेश सावंत, अशोक तटकरे आणि नंदकुमार वत्स