* अयोध्या मंदिराची प्रतिकृती साकारणार
* भक्ती संगीतासह बहारदार कार्यक्रम
ठाणे: संस्कृती आर्ट फेस्टीवल यंदा राम रंगात रंगणार आहे. अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी कलेच्या माध्यमातून ठाणेकरांना भक्तीकडे नेण्याचा हा प्रयत्न असणार आहे. येत्या १२ जानेवारीला या उत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
१५ जानेवारी २०२४ या कालावधीत उपवन तलावाशेजारी रंगणार्या या उत्सवात अयोध्या मंदिराची प्रतिकृतीही उभारली जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना श्री राम मंदिराचे दर्शन शहरातच घडणार आहे.
चार दिवस उपवन तलावाच्या निसर्ग रम्य ठिकाणी होणार्या या उत्सवात ध्यानधारणा, प्रार्थना आणि श्री रामांच्या जीवन प्रवासातील विविध कथा आणि त्यांचे उपदेश देत प्रत्येकाच्या हृदयात देवत्व जागृत करण्याचा उद्देश असेल, असे संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘राम मंदिर’ या मुख्य विषयाला साजेल अशा कला आणि कार्यक्रम प्रस्तुतीची योजना या वर्षासाठी ठरवली असून येथे श्री राम मंदिरातील श्री राम यांच्या मूर्ती आणि ‘श्री राम दरबार’ यांच्या भव्य आणि कलापूर्ण प्रतिकृती असतील असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावेळी उपवन घाट आणि संगीत कारंजे याचे उद्घाटनही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
या चार दिवसांच्या उत्सवात महनीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती, अनेक समाजांचे प्रतिनिधी आणि किमान ६ लाख प्रेक्षक सहभागी होणार आहेत.
उत्सवाचा पहिला दिवस उद्घाटन समारंभातील पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या ‘भक्तिरंग’ या महनीय गायनाने होईल. दुसर्या दिवशी पद्मश्री मालिनी अवस्थी श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोक संगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील. तिसर्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येईल. चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्य कुमार लोक संगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तरंगते ‘तरंग’ हे व्यासपीठ पद्मश्री प्रल्हादसिंह टिपणिया आणि त्यांचा ‘अन्हड’, प्रथमेश लघाटे आणि त्यांचा ‘अंतरी माझ्या श्रीराम’, अन्वेषा हलधर आणि त्यांचा ‘भक्ति राग अनुराग’, पंडित मुकुंदराज देव याचा ‘नाद वैभव’, अनघा पेंडसे आणि प्रशांत काळून्द्रेकर यांचा ‘सगुण…निर्गुण’, हेमा उपासनी, कल्याणी साळुंके, वेदश्री ओक आणि अनंत जोशी यांचा ‘मीरा आणि मी’, संजीवनी भेलांडे यांचा कार्यक्रम होणार आहे.