राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात-आव्हाड

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “राज ठाकरे हे राजकारणाला चित्रपट समजतात”,अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

“राज ठाकरे यांची भूमिका दर पंधरा दिवसाला बदलत असते. त्यामुळे त्याबाबत आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्येही त्यांची आणखी काही वेगळी भूमिका असेल. अभिनेते कसे त्यांची भूमिका चित्रपटानुसार बदल असतात. तसं राज ठाकरे अभिनेते आहेत”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

लाडका भाऊ आणि बहीण योजनेवरुन टीका राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आम्हालाही वाटतं की दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर बरं झालं असतं. राज ठाकरे हे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवत असले तरी महायुतीवर दबाव वगैरे काही करत नाहीत. मराठी मते तुम्ही फोडा असं सगळं हे ठरवून आहे. आता सगळे सर्व्हे येत आहेत. ते सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात येत आहेत. त्यांचे जेवढे वयक्तिक सर्व्हे आहेत ते देखील त्यांच्या विरोधात येत आहेत. त्यामुळे अशी प्यादी वापरायची अशी भाजपाची सवय आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.