ठाणे : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांनी टीका केली होती. याबाबत स्वपक्षातूनही मनसेवर टीकेची झोड उठली होती. यावर ९ एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे यांची प्रत्येक आरोपाला उत्तर देणारी ‘उत्तरसभा ‘आयोजित करण्यात आली आहे.
दुसरीकडे,मनसेने ज्या मूस रोडवर सभेसाठी परवानगी मागितली आहे, त्याऐवजी इतर ठिकाणांचे पर्याय पोलिसांनी त्यांच्यापुढे ठेवले आहेत. मात्र त्याच ठिकाणी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने सभेचे काय होणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. याच दिवशी हिंदी भाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये २८ व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक विवेक फणसळकर उपस्थित राहणार आहेत. यामुळे पोलिसांनी सभेसाठी मूस चौकाऐवजी शहरातील हायलॅन्ड मैदान व काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे दोन पर्याय सुचविले आहेत.
सभा ठरलेल्या ठिकाणी घेणारच – जाधव
गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मूस चौकात राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी दिलेली नसली तरी, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र त्याचठिकाणी सभा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी टिका केली आहे, त्या सर्वांना या सभेतून उत्तर दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.